जळगाव जामोद तहसीलच्या नवीन इमारतीला ‘कौंडावाड्याचे’ स्वरूप; अधिकारी सुस्त, नागरिक त्रस्त!
सौ गिताताई सोनोने
शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना अद्ययावत सुविधा मिळाव्यात या हेतूने जळगाव जामोद येथे तहसीलची नवीन इमारत उभी राहत आहे. मात्र, ही इमारत पूर्ण होण्यापूर्वीच प्रशासकीय अनास्थेमुळे नरकयातनांचे केंद्र बनली आहे. येथील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, दुर्गंधीमुळे कार्यालयात श्वास घेणेही कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, या गंभीर परिस्थितीकडे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
नव्याने बांधकाम होत असलेल्या या इमारतीत लाखो रुपये खर्च करून बसवलेले नळाचे तोट्या (Taps) गायब झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकीकडे पाण्याचा पत्ता नाही, तर दुसरीकडे अस्वच्छतेने कळस गाठला आहे. गुटखा आणि तंबाखू खाऊन भिंतीवर ठिकठिकाणी पिचकाऱ्या मारल्या गेल्याने पांढऱ्याशुभ्र भिंती आता लाल-पिवळ्या झाल्या आहेत.
शौचालयांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचली असून त्याची नियमित साफसफाई होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या घाणीमुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. तहसील कार्यालयात दररोज शेकडो नागरिक आपल्या कामासाठी येतात, मात्र येथील 'स्वच्छता' पाहून त्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे. महिला कर्मचाऱ्यांची आणि कामानिमित्त येणाऱ्या महिलांची यामुळे मोठी कुचंबणा होत आहे.
एकीकडे सरकार 'स्वच्छ भारत अभियाना'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जामोदचे महसूल प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी (SDO) यांचे दालन याच परिसरात असताना, त्यांना हा उग्र वास येत नाही का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
नवीन इमारतीची ही अवस्था असेल, तर भविष्यात या वास्तूचे काय होईल, या विचाराने सर्वसामान्य जनता संताप व्यक्त करत आहे.
"कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन इमारत बांधली जाते, पण साधी स्वच्छता राखता येत नसेल तर या भव्यतेचा काय उपयोग? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी."
— एक त्रस्त नागरिक
0 Comments