सुनगाव येथील स्मशानभूमी बांधकामात भ्रष्टाचार
अनंता धुळे यांची जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार;
तालुक्यातील सुनगाव येथे सुरू असलेल्या स्मशानभूमीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थ अनंता गणपत धुळे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी १० मार्च रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सुनगाव येथे स्मशानभूमीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. मात्र, हे काम करताना अंदाजपत्रकातील (Estimate) तरतुदींना केराची टोपली दाखवण्यात येत आहे.बांधकामाच्या ठिकाणी अनिवार्य असलेला माहिती फलक (Name Plate) अद्याप लावण्यात आलेला नाही.
त्यामुळे या कामासाठी किती निधी मंजूर आहे आणि कंत्राटदार कोण आहे, याबाबत ग्रामस्था अंधारात आहेत.सर्वात गंभीर बाब म्हणजे,बांधकामासाठी शासनाने प्रमाणित केलेली वाळू वापरण्याऐवजी गावातील स्थानिक नद्यांमधील मातीमिश्रित वाळू वापरली जात आहे. मातीचे प्रमाण अधिक असलेल्या या वाळूमुळे बांधकामाचा दर्जा खालावला असून, भविष्यात ही वास्तू कोसळण्याची भीती अनंता धुळे यांनी तक्रारीत व्यक्त केली आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी या बांधकामाकडे फिरकतही नसल्याचे समोर आले आहे. वारंवार सूचना देऊनही अधिकारी लक्ष देत नसल्याने, कंत्राटदार आणि संबंधित अभियंत्यांचे यात संगनमत तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
_____________________
तात्काळ चौकशीची मागणी--
या तक्रारीमुळे जळगाव जामोद तालुक्यात खळबळ उडाली असून, जिल्हा परिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कामाची तांत्रिक तपासणी करून कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्याची मागणी आता जोर धरत आहे.
0 Comments