*खामगाव नगर पालीकेची प्रस्तावित करवाढ रदद् करण्यासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पुढाकार घ्यावा*
....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे जाहीर आवाहन
खामगाव नगर पालिकेच्या प्रस्तावित मालमत्ता करवाढीला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली असून याप्रकरणी मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी लवकरच स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर केल्यानंतर नगर विकास विभागात सुनावणी होणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.खामगाव नगर परिषदेने केलेली प्रस्तावित करवाढ ही सर्वसाधारण नागरीक,व्यापारी व व्यावसायीकांसाठी अन्यायकारक आहे. म्हणून कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ठामपणे शासन दरबारी पाठपुरावा करुन ही प्रस्तावित बेकायदेशीर करवाढ रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.
सानंदा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, करवाढीला खामगावकर जनतेचा विरोध नाही, दर चार वर्षांनी नियमाप्रमाणे करवाढ ही झालीच पाहिजे परंतू तसे न करता खामगाव न.प.ने अव्वाच्या सव्वादराने करवाढ केली आहे.त्या करवाढीला खामगावकर जनतेचा तीव्र विरोध होत आहे. यापुर्वी ज्या मालमत्तेवर 2 हजार रुपये वार्षिक मालमत्ता कर आकारण्यात येत होता त्याच मालमत्तेवर जवळपास 70 हजार रुपयांचा प्रस्तावित करवाढीची नोटीस देण्यात आली आहे. खुल्या भुखंडावर देखील अनेक पटीने मालमत्ता कर वाढविण्यात आले आहे.म्हणून खामगाव न.प.ने जी अवाजवी कर वाढ केली त्या करवाढी विरोधात व्यापारी, व्यावसायिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी आक्षेप नोंदवत आंदोलनही केले.केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी या करवाढी विरोधात पुढाकार घेऊन डॉक्टर, वकील, नागरी संघटनांच्या प्रतिनिधींसह शहरातील सर्व संबंधीत मालमत्ता धारकांची खामगावात बैठक घेवून चर्चा केली होती. नामदार प्रतापराव जाधव यांनी हा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहचविला.त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेवुन दि.1 एप्रिल 2026 रोजीच्या पत्रान्वये खामगाव न.प.च्या मालमत्ता करवाढीला तात्पुरती स्थगीती देण्याचे आदेश देवुन या प्रकरणी लवकरच नगर विकास विभागात सुनावणी ठेवा असे निर्देश दिले आहे. यामुळे प्रस्तावित करवाढीला तात्पुरता स्थगनादेश मिळालेला परंतू ही स्थगीती कायम राहणार की नाही हे मा.जिल्हाधिकारी, खामगाव नगर पालीका प्रशासन आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या भुमिकेवर अवलंबुन आहे,अन्यथा नगर विकास मंत्र्यांनी दिलेला स्थगनादेश जास्त वेळ टिकणार नाही.
आकाश फुंडकर यांना खामगाव शहरवासीयांनी भरभरून मते दिली.फुंडकर यांना आमदार बनविण्यामध्ये तसेच खामगाव नगर पालिकमध्येसुद्धा भाजपाची सत्ता आणण्यामध्ये खामगाव शहरवासीयांचा सिंहाचा वाटा आहे. या प्रस्तावित अवाजवी करवाढीला सर्व स्तरातून विरोध होत आहे म्हणुन अश्या परिस्थितीमध्ये आकाश फुंडकरांनी त्यांचे प्रथम कर्तव्य समजुन खामगाव शहर वासीयांना न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा, खामगाव नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्षा यांच्यासह सर्व सदस्यांनी न.प.सभेमध्ये ही अन्यायकारक करवाढ मागे घेण्याचा ठराव घ्यावा व खामगाव शहर वासीयांची ही रास्त मागणी शासन दरबारी पुर्ण शक्तीनिशी मांडावी, असे जाहीर आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे. तसेच केंद्रीय राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी पुढाकार घेवुन खामगाव नगर परिषदेच्या मालमत्ता करवाढीला उपमुख्यमंत्री महोदयांकडून स्थगीती मिळवुन दिल्याबदद्ल केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी खामगाव शहर वासीयांच्या वतीने हार्दिक आभार देखील मानले आहे. खामगाव शहर वासीयांवर झालेली ही अन्यायकारक करवाढ रदद् करण्याचे भवितव्य खामगाव नगर पालीका व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या भुमिकेवर अवलंबुन आहे एवढे मात्र खरे.
0 Comments