तणावमुक्त तरुण – सशक्त भारत
"आजची तरुणाई ही उद्याच्या भारताची ताकद आहे. पण हीच ताकद जर तणावाच्या ओझ्याखाली दबली, तर सशक्त भारताचे स्वप्न साकार होणे कठीण आहे."
एकेकाळी ताण-तणाव हा फक्त मोठ्या माणसांच्या आयुष्याचा भाग मानला जायचा. परंतु आजचे वास्तव वेगळे आहे. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या दडपणाखाली जगताना दिसतो. अभ्यासातील स्पर्धा, परीक्षांचे दडपण, करिअरची चिंता, सोशल मीडियावरील तुलना, कुटुंबाच्या अपेक्षा आणि स्वतःला सतत सिद्ध करण्याची धडपड यामुळे आजची पिढी मानसिक तणावाचा सामना करत आहे.
बालपण म्हणजे निरागस हसू, खेळ, स्वप्ने आणि आनंद. परंतु आज अनेक मुलांचे बालपण पुस्तकांच्या ओझ्याखाली आणि गुणांच्या शर्यतीत हरवताना दिसते. तरुणपण हे आयुष्य घडवण्याचे सुवर्णपान असते; मात्र ताण, नैराश्य आणि अपयशाच्या भीतीमुळे अनेक तरुण मानसिकदृष्ट्या खचत आहेत. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर, नातेसंबंधांवर आणि भविष्यावर होत आहे.
सशक्त भारत घडवायचा असेल तर प्रथम तणावमुक्त तरुणाई घडवावी लागेल. मुलांना आणि तरुणांना केवळ गुणांसाठी नव्हे, तर जीवन जगण्याचे कौशल्य, आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि भावनिक स्थैर्य शिकवणे आवश्यक आहे. पालकांनी अपेक्षांचे ओझे न लादता मुलांचे मन समजून घ्यावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेपेक्षा सहकार्याची भावना निर्माण करावी. समाजाने मानसिक आरोग्याबाबत मोकळेपणाने संवाद साधावा.
आजची तरुण पिढी वाढत्या तणावामुळे अनेक मानसिक संघर्षांना सामोरी जात आहे. काही तरुण नैराश्य, एकटेपणा आणि अपयशाच्या भीतीने इतके खचून जातात की, त्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलच एकमेव मार्ग वाटू लागते. परंतु आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट उगवते, त्याचप्रमाणे प्रत्येक कठीण प्रसंगालाही मार्ग असतो.
तणावाच्या काळात अनेक तरुण स्वतःच्या विश्वात हरवून जातात. ते कुटुंबीयांपासून, मित्रांपासून आणि समाजापासून दूर राहू लागतात. मनातल्या वेदना, भीती आणि चिंता कोणाशीही न बोलल्यामुळे त्या अधिक वाढतात. पण मन मोकळे करून बोलणे हेच तणावावर मात करण्याचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.
पालक, शिक्षक, मित्र किंवा समुपदेशक यांच्याशी संवाद साधल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. मदत मागणे ही कमजोरी नसून, स्वतःला सावरण्याची ताकद आहे.
आजच्या तरुणांनीही स्वतःसाठी एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे. आपल्या मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या, गरज वाटल्यास मदत घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा—तुमचे आयुष्य अमूल्य आहे. प्रत्येक संकटावर मात करण्याची क्षमता तुमच्यात आहे.
तणावावर विजय मिळवणारा तरुणच सशक्त भारताचा खरा शिल्पकार ठरतो. म्हणूनच, बोलूया, ऐकूया आणि एकमेकांना आधार देऊया. कारण कधी कधी एका आपुलकीच्या संवादामुळे एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते.
योग, ध्यान, व्यायाम, वाचन, संगीत, छंद जोपासणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे आणि मित्रांशी मनमोकळा संवाद साधणे यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. गरज वाटल्यास समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यात कोणताही कमीपणा नाही. मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे.
भारताला जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखले जाते. ही तरुण शक्ती जर निरोगी, आत्मविश्वासपूर्ण आणि तणावमुक्त असेल, तर भारताला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवण्याची ताकद तिच्यात आहे.
तणावमुक्त तरुण म्हणजे सशक्त कुटुंब, सशक्त समाज आणि सशक्त भारत.
कारण देशाचे भविष्य घडवणारे हात मजबूत असण्याइतकेच, त्यामागील मनही आनंदी आणि सक्षम असणे तितकेच महत्त्वाचे आहे.
"चला, तणावावर मात करून सक्षम तरुणाई घडवूया आणि सशक्त भारताच्या निर्मितीत आपणही आपले योगदान देऊया. स्वतःसाठी एक पाऊल पुढे टाकूया, मन मोकळं करून बोलूया, एकमेकांना आधार देऊया आणि आशेचा नवा किरण बनुया.
लेखिका : श्रद्धा मंगेश कोल्हटकर (डगवार) अमरावती
8766540513
0 Comments