Advertisement

जळगाव जामोद परिसरात वनविभागाची मोठी कारवाई; लाखो रुपयांचा अवैध लाकूड साठा जप्त

*​जळगाव जामोद परिसरात वनविभागाची मोठी कारवाई; लाखो रुपयांचा अवैध लाकूड साठा जप्त*
*​बुलढाणा दि.18(जिमाका):* जळगाव जामोद ते संग्रामपूर रोडवरील चांगोफळ परिसरात वनविभागाने दोन वेगवेगळ्या दिवशी धाडी टाकून अवैध लाकूड साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना साठवून ठेवलेले तब्बल ३६८ नग नीम (कडूूिलंब) प्रजातीचे लाकूड जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत ४ लाख ७९ हजार ५०० रुपये आहे. या प्रकरणी वनविभागाने वनगुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

​मिळालेल्या माहितीच्या आधारे, वनविभागाच्या पथकाने १४ मे २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता आणि १७ मे २०२६ रोजी दुपारी १२:३२ वाजता चांगोफळ येथील संशयास्पद ठिकाणांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान विनापरवाना आणि अवैध रीतीने साठवून ठेवलेला कडूिलंबाच्या लाकडांचा साठा आढळून आला. वनविभागाने तातडीने या जागेचा रितसर मौका पंचनामा करून वन गुन्हा नोंदवला आहे. यासोबतच खाटूश्याम सॉ मिल, न्यू सातपुडा सॉ मिल आणि जामोद परिसर या ठिकाणांचीही कसून तपासणी करण्यात आली.


​​तपासणी दरम्यान खाटूश्याम सॉ मिलच्या बाहेरील एका खाजगी जागेमध्ये अवैध लाकूड साठा लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. या कारवाईत अंदाजे ५० घणमीटर (३६८ नग) माल जप्त करण्यात आला आहे.
​ही धडक कारवाई उपवनसंरक्षक (बुलढाणा) जमीर शेख आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (जळगाव जामोद) निलेश काळे, वनपाल (वरवट बकाल) एस. एस. सावळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून यशस्वीरीत्या पार पाडली. या मोहिमेत मोबाईल स्क्वॉड खामगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश राऊत व कर्मचारी, तसेच जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील वनरक्षक जी. एस. साकळे (भेडवळ बीट), कुशोड, कडवकर, गव्हाणे, साळवे आणि प्रणव हागुणे या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

​अवैध माल वाहतूक आणि साठवणुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी परिसरातील सर्व सॉ मिल्सची (saw mills) टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाईल, असा इशारा वनविभागाने दिला आहे. शासन एकीकडे वृक्षलागवडीचे मोठे उद्दिष्ट देत असताना, दुसरीकडे होणारी अवैध वृक्षतोड आणि वाहतूक अजिबात सहन केली जाणार नाही. मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्या देखरेखीखाली अशीच कडक कारवाई यापुढेही सुरू राहील, असे विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्याच्या वाढत्या तापमानात वृक्षांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोड आणि वाहतूक करणाऱ्यांवर वनविभाग अत्यंत कडक पावले उचलत आहे. नागरिकांना कुठेही अशी अवैध बाब निदर्शनास आल्यास त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments