*राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन*
खामगाव /(संतोष आटोळे)
सजंय गांधी व श्रावण बाळ निराधार योजनेच्या मागील वर्षाच्या पेंडींग केसेस लवकरात लवकर मार्गी लावाव्यात व पटवाऱ्याकडून प्रत्यक्ष लाइव्ह फोटोची जाचक अट रद्द करावी या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजना व दिव्यांग बांधवांची पेंशन योजना तसेच विधवा निराधारांना मासिक मानधन मिळावे याकरीता २०२५ पासून ते आजपर्यंत आपल्या कार्यालयात हजारो अर्ज ऑनलाईन पध्दतीने केले गेले आहेत. तरी सदर अर्जावर तातडीने मिटींग घेऊन निकाली काढण्यात यावेत. अनेक अर्ज बाद करुन त्यामध्ये संबंधीत पटवाऱ्याचे लाभार्थ्यासोबत घराच्या लाईव्ह फोटोसह टाकण्यात आलेली अट रद्द करण्यात यावी. जेणेकरुन गरजू लाभार्थ्यांना त्वरीत लाभ मिळण्यास मदत होईल.
तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने काढण्याची अट शासनाने लागू केली आहे. सदर प्रमाणपत्र काढल्यानंतर ते संबंधीत ऑफीस मध्ये जमा करणे बंधनकारक आहे काय याबाबत लाभार्थ्यांमध्ये अनेक गैरसमज निर्माण होत आहेत व विनाकारण संबंधीत कार्यालयामध्ये दिव्यांग बांधव, वयोवृद्ध महिला ह्या चकरा मारुन हेलपाटे घेत आहेत. त्यांना होणारी गैरसोय टाळण्याकरीता व योजनेचा प्रसार व प्रचार हा लाभार्थ्यांपर्यंत पोहचेल याकरीता पुरेपुर प्रयत्न करण्यात यावेत.
सदर मागणीची दखल न घेतल्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी दिला आहे.
सदर निवेदनाच्या प्रतिलिपी ना.संजय सिरसाठ सामाजिक न्याय मंत्री ,ना.विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता,हर्षवर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,बच्चुभाऊ कडू, विधान परिषद सदस्य,ना. मकरंद जाधव पालकमंत्री,जिल्हाधिकारी बुलडाणा,डॉ. बबनराव तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी महासंघ नागपूर यांना पाठविण्यात आल्या आहेत
0 Comments