५३ वर्षाची अखंड परंपरा
प्रतिनिधी जळगाव जामोद - श्रीसंत गजानन महाराज मंदिर, निर्मल नगरी, नागपूर येथील श्री गजानन भक्तांची जळगाव जामोद ते शेगाव अशी पायीवारी शुक्रवार दि.१२ व शनिवार दि.१३ अशी दोन दिवस राहणार आहे. या पायीवारीमध्ये सुमारे आठशे भक्तांचा सहभाग राहणार असून पायीवारीचे हे ५३ वे वर्ष आहे .
नागपूरचे भक्त वाहनाने आसलगाव येथे येतील व गावातून पालखीची नगर परिक्रमा करीत डॉ. गावंडे यांच्या मळ्यात महाप्रसादाचे सेवन करतील. त्यानंतर जळगाव जामोद येथे गुरुवार दि. ११ जानेवारी रोजी दुपारी योगीराज नगरस्थित श्रीसंत गजानन महाराज मंदिरात पोहोचतील .नंतर "श्रीं "च्या मंदिरातून पालखीची शोभायात्रा दुपारी ४ वाजता निघणार आहे. यामध्ये टाळ, वीणा, मृदुंग,पताका यासह अभंगाच्या निनादात राजवैभवी थाटात पालखीची नगर परिक्रमा होणार आहे.
दुर्गा चौक, चौभारा चौक, मानाजी चौक, बाजार ओळ व कॉटन मार्केट असा पालखीच्या नगर परिक्रमेचा मार्ग असेल. रात्रीचा मुक्काम कृषी विज्ञान केंद्रात राहणार असून भाविकांना सुपो ग्रुप तर्फे महाप्रसाद देण्यात येणार आहे .
शेगावच्या पायीवारी करिता शुक्रवार दि.१२ जानेवारीला सकाळी ७ वाजता मंदिराचे प्रमुख सुनीलभाऊ बालपांडे यांच्या मार्गदर्शनात सुरुवात होईल .या पायीवारीमध्ये आठशे भक्तांचा सहभाग राहणार असून आध्यात्मिक वातावरणात व कडाक्याच्या थंडीत पायीवारीला भक्तांकडून अत्यंत उत्साहात सुरूवात होईल. वडशिंगी येथे चहापाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असून श्रीसंत गजानन महाराज पानपोई, खेर्डा यांच्या वतीने श्रीसंत सखाराम महाराज मंदिर, इलोरा येथे दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था वारकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. पालखीचा रात्रीचा मुक्काम हा पेसोडा येथे राहणार आहे.
शनिवार दि.१३ रोजी पेसोडा येथून पालखी दिंडीचा प्रवास भोनगाव, जानोरी ,शेगाव असा राहणार असून भोनगाव येथे अल्पोपहार तर जानोरी येथील ग्रामस्थांच्या वतीने दुपारी सर्व वारकऱ्यांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी पाच वाजता शेगाव येथे 'श्रीं"च्या मंदिरात पायीवारी पोहोचेल.या पालखी वारीमध्ये भक्तांनी शुद्ध भाव ठेवून सहभागी व्हावे ,असे आवाहन मंदिराचे सचिव सुनीलभाऊ बालपांडे यांनी केले आहे.
(फोटो -श्री संत गजानन महाराज)
0 Comments