*पूर्णा नदीपात्रात वाळू उपशाचा ‘तांडव’; ५० बोटींच्या सहाय्याने दिवसाढवळ्या लूट!*
*शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; ७ दिवसांत कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयाला घेराव...*
तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून, वाळू माफियांनी प्रशासकीय यंत्रणेला धाब्यावर बसवले असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. सुमारे ५० हून अधिक बोटी आणि मशिनरीच्या सहाय्याने दररोज हजारो ब्रास वाळू चोरली जात असून, याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख गजानन नामदेवराव वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पूर्णा नदीपात्रातील माहुली (अ), माहुली (ब), गोळेगाव पांडे, गोळेगाव हुरसाळ, मानेगाव, हिंगणा बाळापूर, दादुलगाव जुने, मांडवा, निमकर्ड या घाट परिसरातून बोटींच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा केला जात आहे. दररोज शेकडो हायवा, ट्रक आणि टिप्परद्वारे ही वाळू अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांत पोहोचवली जात आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.गजानन वाघ यांनी महसूल मंत्री आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन तहसीलदारांना पुरावे सादर केले होते. तहसीलदारांनी अवैध उपसा सुरू असल्याचे मान्य केले, मात्र कारवाईसाठी आवश्यक 'स्फोटक' आणि 'नाव' (बोट) उपलब्ध नसल्याचे सांगत हात झटकले आहेत."गेल्या वर्षी याच वाळू माफियांवर कारवाई झाली होती, मग यंदा प्रशासन गप्प का? वाळू माफियांना पाठीशी घालणारा 'गॉडफादर' कोण आहे? की अधिकाऱ्यांचे वाळू माफियांशी आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत?" असा संतप्त सवाल गजानन वाघ यांनी उपस्थित केला आहे.या अवैध वाळू उपशामुळे नदीचे पात्र ओरबडले जात असून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. जर पुढील ७ दिवसांच्या आत नदीपात्रातील ५० बोटी, जेसीबी आणि पोकलँड जप्त करून वाळू उपसा बंद केला नाही, तर जळगाव जामोद शिवसेना स्टाईलने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर 'उग्र धरणे आंदोलन' करून घेराव घालणार आहे. त्यानंतर होणाऱ्या परिणामास शासन आणि प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही वाघ यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री मकरंदजी पाटील यांनाही पाठवण्यात आल्या असून, आता शासन यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments