Advertisement

युगधर्म पब्लिक स्कूल येथे मातृपितृ पूजन सोहळा उत्साहात संपन्न*खामगाव/(संतोष आटोळे)

*युगधर्म पब्लिक स्कूल येथे मातृपितृ पूजन सोहळा उत्साहात संपन्न*
खामगाव/(संतोष आटोळे)               स्थानिक सूर्योदय एज्युकेशन  सोसायटी द्वारा संचलित "युगधर्म पब्लिक स्कूल "येथे १४ फेब्रुवारी रोजी मातृपितृ पूजन सोहळा अत्यंत भक्तिमय, संस्कारमय व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे संपूर्ण शाळा परिसरात आदर, कृतज्ञता व संस्कारमय वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष गोपालजी अग्रवाल उपस्थित होते, तर कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य अनिरुद्ध अवचार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानाची आराध्य देवता माता सरस्वती यांच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे विधीपूर्वक पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी पालकांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला. यावेळी अनेक पालक भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मातृ-पितृभक्ती, कुटुंबीयांविषयी आदर, संस्कारमूल्ये व सामाजिक बांधिलकी यांची जाणीव दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मातृ-पितृप्रेम दर्शविणारी भाषणे, गीत, श्लोक व सांस्कृतिक सादरीकरणे सादर केली. “आई-वडील हेच प्रथम गुरु आहेत” हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडला. पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा संस्कारक्षम कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
पालकांनी व्यक्त केले मनोगत
या वेळी पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या संस्कारप्रधान शिक्षणपद्धतीचे कौतुक केले. वर्ग सहावीच्या पालक सौ. सोंटक्के यांनी सांगितले की, “माझा मुलगा नेहमी सांगतो की आमच्या शाळेत संस्कृत श्लोक, हनुमान चालीसा, गणपती स्तोत्र व पसायदान यांचे नियमित पठण केले जाते. पालक या नात्याने मला अभिमान वाटतो की माझा मुलगा संस्कारांचे जतन करणाऱ्या युगधर्म शाळेत शिक्षण घेत आहे.”
तसेच सौ. देशमुख यांनी आपल्या मनोगतात आजच्या आधुनिक काळात मुलांमध्ये चांगल्या संस्कारांची नितांत गरज असल्याचे सांगितले. युगधर्म शाळा विद्यार्थ्यांमध्ये हे संस्कार रुजविण्याचे कार्य करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. श्री सव्वालाखे यांनी मातृपितृ पूजनासारखा संस्कारक्षम कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शाळेचे आभार मानले.
यावेळी अध्यक्ष गोपालजी अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आधुनिक युगात मुलांमध्ये संस्कार व कुटुंबमूल्यांची जपणूक होणे अत्यंत आवश्यक असून अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास मोठी चालना मिळते. प्राचार्य अनिरुद्ध अवचार यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांचा आदर करण्याचे व त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद व शाळेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पालकांनी शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार जोपासण्याच्या प्रयत्नांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments