Advertisement

छत्रपती शिवरायांचे आजोळ असल्याने आम्ही अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे..:- डीवायएसपी मनीषा कदम* (अहिल्या न्यूज जिल्हा प्रतिनिधी याकूब शेख)

*छत्रपती शिवरायांचे आजोळ असल्याने आम्ही अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे..:- डीवायएसपी मनीषा कदम* (अहिल्या न्यूज जिल्हा प्रतिनिधी याकूब शेख)

छत्रपती शिवरायांच्या जडणघडणीत आणि स्वराज्य स्थापनेत महत्त्वपूर्ण वाटा हा राष्ट्रमाता,आई जिजाऊ मा साहेबांचा होता. जिजाऊ मुळे छत्रपती शिवराय घडले, त्या अर्थाने मातृतीर्थ सिंदखेड राजाच्या  मातीत आम्ही राहातो, या अभिमानाबरोबरच महापुरुषांची जयंती साजरी करत असताना अधिक जबाबदारीचे वर्तन आपल्या सर्वांकडून घडलं पाहिजे अशी अपेक्षा उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी किनगाव राजा येथे आयोजित शांतता कमिटीच्या सभेमध्ये व्यक्त केल्या.
आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवजयंतीच्या व पवित्र रमजान महिन्याच्या उत्सवाच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था रोख पार पाडण्याच्या दृष्टीने ही सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी कीनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर यांनी आपल्या प्रास्तविक मनोगतात आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वांनी पार पाडायची कर्तव्य याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित असलेले लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीणभाऊ गीते यांनी सभेच्या समारोपीय वेळी आपल्या सर्वांना आपला गावगाडा चालवावा लागतो.

त्यामुळे प्रसंगाचे अवधान राखत व नव्या पिढीच्या भावना समजून घेत कुठलाही अनुचित प्रकार न होता महापुरुषांच्या जयंती व उत्सव साजरे करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. पोलिसांचे अपुरे संख्याबळ पाहता ही जबाबदारी नुसती प्रशासनावर न ढकलता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेपोटी आपण ती पेलली पाहिजे. महापुरुषांचा विचार हा मानवी कल्याणाचा विचार राहिला आहे. समाजातील  माणूसपण आबादीत ठेवण्यासाठी, विविध जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ते टिकवण्याची जबाबदारी तुमची माझी सर्वांची आहे असे विचार त्यांनी याप्रसंगी काढले. या सभेसाठी दुय्यम ठाणेदार मोहन गीते यांच्यासह किनगाव राजा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष,उत्सव समिती चे अध्यक्ष व सदस्य व इतर सामाजिक घटकातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments