Advertisement

टिळक राष्ट्रीय विद्यालयात पुरस्कार सोहळा संपन्न* कला आणि विधायक कार्याचा उत्तम समन्वय डॉ.राजेश राजोरे यांचे प्रतिपादन.खामगाव/(संतोष आटोळे)

*टिळक राष्ट्रीय विद्यालयात पुरस्कार सोहळा संपन्न* 
कला आणि विधायक कार्याचा उत्तम समन्वय 
डॉ.राजेश राजोरे यांचे प्रतिपादन.
खामगाव/(संतोष आटोळे) 
              कला आणि विधायक कार्याचा समन्वय हा राष्ट्र निर्मिती सोबतच सेवा, समर्पण आणि त्यागाचा  यज्ञ असून त्यात आजन्म त्यागाच्या समिधा टाकणाऱ्या कलाचार्य पंधे गुरुजींच्या  स्मृतिंची जपणूक ही दुर्मिळातील दुर्मिळ बाब असून ती टिळक राष्ट्रीय विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या भावनेत खोलवर दिसून येते. यातूनच पुढच्या पिढीपर्यंत संस्काराचा गाभा पोचेल आणि या संस्थेचे कार्य चिरंतन राहील असे प्रबोधनात्मक प्रतिपादन दैनिक देशोन्नतीचे आवृत्ती संपादक डॉक्टर राजेश राजोरे यांनी कलाचार्य पंधे गुरुजी प्रतिष्ठान द्वारा आयोजित पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी केले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर अजबे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ह. भ .प. हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त अशोक झुंझुनूवाला, सुरेश पारीक, उमेश अग्रवाल, सचिव संजय पातुर्डे, रमेश दाणे, शंकरराव बगाडे, डॉक्टर अरविंद जोशी उपस्थित होते. कार्य बाहुल्यामुळे खामगावचे प्रांताधिकारी डॉक्टर रामेश्वर जी पुरी यांनी समारंभ स्थळी धावती भेट दिली आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. शिल्पकला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे 25 फूट उंचीचे शिल्प उभारणारे दीपक हिवराळे यांचा सपत्नीक ललित कला पुरस्कार प्रदान करून तथा संस्थेतील निवृत्त कार्यकर्ते भगवान किसन बळी यांचा विधायक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, वस्त्रे , शाल आणि श्रीफळ, असे या पुरस्कारांचे स्वरूप असून यंदाचा पुरस्कार चौतीसावा होता.

     डॉक्टर राजेश राजोरे यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, या संस्थेच्या भाग्यात निरपेक्ष संचालकांची भागीदारी असल्याने संस्थेला आता चांगले दिवस येऊ घातले आहेत. पुढच्या काळात संस्थेतील कला संस्कृती आणि गांधीजींची विधायक संस्कृती जपत स्वावलंबी आणि राष्ट्रप्रेमी विद्यार्थी तयार करणे हे उद्दिष्ट संस्थेला आणि पर्यायाने खामगाव शहराला उंचीवर नेऊन ठेवेल अशी आपल्याला खात्री वाटते. त्यांनी कलाचार्य पंधे गुरुजींच्या जीवनाचा आढावा घेत त्यांचे चळवळीतील योगदान आणि कलेतील योगदान यांचा गौरव केला. तसेच पुरस्कारार्थींचा मुक्तकंठाने गौरव करून त्यांच्या सेवेला अभिवादन केले.ह.भ.प. वेरूळकर गुरुजींनी आशीर्वाद पर भाषण करताना राष्ट्रीय विद्यालयातील गौरवपूर्ण परंपरांचा उल्लेख करीत संस्था राष्ट्र उभारण्याच्या कार्यात देत असलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद दिले. भगवान बळी यांचे चिरंजीव शिरीष बळी आणि दीपक हिवराळे यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दीपक हिवराळे यांनी पुरस्काराची रक्कम दिवंगत कार्यकर्ता पवन शर्मा यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून प्रदान केली. प्रस्तावना कलाचार्य पंधे गुरुजीं प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर मनिष अजबे यांनी केले. विश्वस्त रमेश दाणे यांनी आपली भूमिका यावेळी मांडली. संस्थेतील कला परंपरा जिवंत राहावी आणि संगीताचे स्वर पुन्हा या आवारात गुंजावेत यासाठी जी व्यवस्था लागेल त्या प्रीत्यर्थ त्यांनी दहा हजार रुपये रोख संस्थेला प्रदान केले. त्याचप्रमाणे लताताई राजपूत यांनी त्यासाठी तसेच रंगमंच दुरुस्तीसाठी 62 हजार रुपयांची देणगी संस्थेला दिली. संस्थेचे सचिव आणि मुख्याध्यापक संजय पातुर्डे गुरुजी यांनी छात्रालयाच्या जीर्णोद्धारासाठी 75 हजार रुपयाची देणगी जाहीर केली होती. त्यापैकीची उर्वरित पन्नास हजार रुपयांचा धनादेश यावेळी प्रदान केला. डॉक्टर अरविंद जोशी यांनी जोशी गुरुजींच्या स्मृती प्रित्यर्थ एक हजार रुपये चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपयाची देणगी तसेच यशवंत निंबाळकर स्मृती प्रीत्यर्थ च्या बक्षिसाची रक्कम यावेळी त्यांचे पुत्र शिरीष निंबाळकर यांच्या वतीने समारंभात सुपूर्त करण्यात आली. सुरुवातीला छाया तेलगोटे यांच्या विद्यार्थिनी आणि लताताई राजपूत यांची नात यांनी स्वागत नृत्य सादर केले. त्यांनाही भरघोस बक्षीसे यावेळी देण्यात आली. इंदोर वरून आलेले संस्थेचे माजी विद्यार्थी प्रभाकर अजबे आणि शैलाताई अजबे यांनी वरदे बिना वादिनी वरदे हे प्रार्थना गीत आणि नम्रता गावंडे यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव राजेश राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण भगत यांनी केले. समारंभास अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्यापैकी 50 वर्षानंतर भेट देणारे शिवगीर गोसावी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. भोजन गृहा जवळील मंडप व्यवस्था निर्माण करणाऱ्या नरसिंह मंदिराच्या विश्वस्तांच्या हस्ते यावेळी शेडचे उद्घाटन करण्यात आले आणि संतोषसेठ 
 डिडवाणीया  यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. शहरातील मान्यवर आणि अनेक भगिनी यांनी समारंभास उपस्थितीत दिली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक,कार्यकर्ते, माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments