*'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा'तून लाभार्थ्यांना दाखल्यांचे वितरण*
खामगाव:- दि.१२ (उमाका)महाराष्ट्र शासनाच्या जनहितकारी धोरणानुसार, महसूल प्रशासन जनतेच्या दारी नेण्याच्या उद्देशाने आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्व मंडळ हिवरखेड अंतर्गत 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' जिल्हा परिषद विद्यालय, रोहना येथे उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय दाखले व योजनांच्या लाभांचे थेट वितरण करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती आणि उद्घाटन:
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहना ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती सविताताई गव्हाळे होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून नायब तहसीलदार निखिल पाटील, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार शिरीष वसावे, उपसरपंच यशोदाबाई खंडारे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रामदास बोचरे, मुख्याध्यापिका पुष्पा कोळी, ग्रा.पं. सदस्य जयश्री घोगले, वैभव राहणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
योजनांची माहिती आणि जनजागृती:
प्रास्ताविक करताना मंडळ अधिकारी नितीन देशमुख यांनी महसूल विभाग व इतर संलग्न विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्न दाखले जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा विभागाचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या पोट-हिश्श्यांची मोजणी करून नकाशे व सातबारा अधिकार अभिलेख अद्यावत करण्याबाबतच्या नवीन शासन निर्णयाची माहिती दिली. ग्राम महसूल अधिकारी दिनेश शेळके यांनी 'जिवंत सातबारा' मोहिमेचे महत्त्व विशद केले.
थेट लाभ वितरण:
या शिबिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात एकूण ५१ दाखल्यांचे व लाभांचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने:
* जातीचे दाखले: १५
* अधिवास प्रमाणपत्र (Domicile): १२
* विशेष अर्थसहाय्य योजना (मंजुरी आदेश): ०८
* आर.ओ. कॅन व जन्म प्रमाणपत्र (ग्रा.पं. कंझारा): ०५
* वारस फेरफार, ७/१२ व ८अ उतारा: १०
* कृषी विभाग (द्रवरूप जैविक खत): ०१
परिश्रम आणि आभार:
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी नितीन देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी शरद नगराळे यांनी मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हिवरखेड मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, सेतू केंद्र चालक पवन वेरुळकर आणि धम्मा गवई यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी रोहना व परिसरातील विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments