Advertisement

सुनगावचा पाणीपुरवठा 'जेसीबी'च्या दाढेत अडकला; १३ दिवसांपासून अर्धेगाव तहानलेले, प्रशासकीय ढिसाळपणाचा कळस..सौ गिता सोनोने

सुनगावचा पाणीपुरवठा 'जेसीबी'च्या दाढेत अडकला; १३ दिवसांपासून अर्धेगाव तहानलेले, प्रशासकीय ढिसाळपणाचा कळस..सौ गिता सोनोने 



तालुक्यातील सुनगाव येथे रस्ता खोदकामामुळे मुख्य पाईपलाईन पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याने गेल्या १३ दिवसांपासून अर्धेगावचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर हजारो ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली असून, दुरुस्तीसाठी साधी 'जेसीबी' उपलब्ध नसल्याचे शुल्लक कारण पुढे करून काम रखडल्याने संताप व्यक्त होत आहे.सुनगाव येथील बुऱ्हानपूर रस्त्यापासून ते नवीन बस स्टँडपर्यंतच्या रस्ता कामात पूर्वीची महाजल आणि '१४० गाव पाणीपुरवठा योजनेची' मुख्य वाहिनी पूर्णतः उखडून बाहेर काढण्यात आली आहे. रस्ता खोदताना ही पाईपलाईन रस्त्याच्या मध्यभागी असल्याचे आढळून आले, ज्यामुळे संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. १२ मार्च रोजी काही प्रमाणात काम सुरू झाले, मात्र दुसऱ्या दिवशी 'जेसीबी' उपलब्ध नसल्याने काम पुन्हा थांबले आहे.या गंभीर परिस्थितीबाबत बोलताना ग्राम विकास अधिकारी हितेंद्र जोशी यांनी दैनिक महासागर प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की,"सध्या पाणीपुरवठ्याबाबत साहित्याची आणि सामानाची जुळवाजुळव करणे सुरू आहे. लवकरच गावाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे थोडा त्रास तर होणारच आहे, मात्र आमचेही काम युद्धपातळीवर सुरू असून ग्रामस्थांना लवकरच पाणी मिळेल."
एकीकडे प्रशासन 'लवकरच' असे आश्वासन देत असले तरी, १३ दिवसांपासून रिकामे हंडे घेऊन फिरणाऱ्या ग्रामस्थांचा संयम आता सुटत चालला आहे. याप्रकरणी जळगाव जामोदचे गट विकास अधिकारी (BDO) संदीप कुमार मोरे तसेच जिल्हा परिषद विशेष कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी स्वतः या विषयात लक्ष घालून तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी सुनगाववासीयांनी केली आहे.


​________________________________
​"रस्त्याचे काम महत्त्वाचे आहेच, पण पाईपलाईन कापण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था का केली नाही?" असा सवाल नागरिक विचारत आहेत. सध्या 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी अवस्था झाली असून, ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ हालचाल न केल्यास ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे..

Post a Comment

0 Comments