बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाळांची होणार पटपडताळणी; विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक
बुलढाणा : जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने जारी केले आहेत. ही पटपडताळणी इयत्ता 2 री ते 9 वी आणि 11 वी या वर्गांसाठी दि. 11, 15 आणि 22 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र पडताळणी केली जाणार नाही. त्यांच्या उपस्थितीचा आधार बोर्डाच्या परीक्षेतील उपस्थितीवर घेतला जाणार आहे.
दरम्यान, दि. 11 ते 22 एप्रिल या कालावधीत वार्षिक परीक्षा आयोजित करण्यात येणार असून, इयत्ता 2 री ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित चाचणी-2 (PAT-3) परीक्षा देखील याच काळात पार पडणार आहे. याच कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळांची प्रत्यक्ष पटपडताळणी केली जाणार आहे.
इयत्ता 11 वीच्या मराठी, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांच्या पेपरच्या दिवशी म्हणजे अनुक्रमे 11, 15 आणि 22 एप्रिल रोजी शिक्षण विभागाने नियुक्त केलेली पथके शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासणार आहेत. त्या दिवशी उपस्थित आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची वर्गनिहाय माहिती ऑनलाईन स्टुडंट पोर्टलद्वारे शासनाला सादर केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
शाळांकडून विद्यार्थ्यांना आणि पालकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, परीक्षेला व पटपडताळणीस उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे. जर विद्यार्थी गैरहजर राहिले तर त्याचा परिणाम शाळेच्या संच मान्यतेवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी नियोजित तारखांना परीक्षेला आणि पटपडताळणीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments