
*जिल्हा रुग्णालयातील वादग्रस्त वैद्यकीय साहित्य खरेदी प्रकरण..
*मनसेची आरोग्यसेवा आयुक्तालयाकडून चौकशीची मुख्यमंत्र्याकडे मागणी
बुलढाणा – कोव्हिड काळात जिल्हा सामान्य रुग्णालयात संपूर्ण अनुदानातुन विविध प्रकारचे साहित्य व यंत्र सामग्री खरेदी करण्यात आली होती. मनसेच्या तक्रारीनंतर या वादग्रस्त साहित्य खरेदी प्रकरणी आरोग्यसेवा उपसंचालक अकोला यांच्याकडून सहा सदस्यीय समिती नेमण्यात आली परंतू नेमण्यात आलेल्या समितीच्या कामातही पारदर्शकता जाणवत नसल्याने सदर प्रकरणाची आरोग्यसेवा आयुक्तालय, मुंबई यांच्याकडून चौकशी करावी अशी मागणी २१ जुलै रोजी बुलढाणा मनसे तालुका अध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे कोव्हिड काळात वैद्यकीय साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली होती. या वैद्यकीय खरेदीनुसार ते- ते साहित्य रुग्णालयाच्या त्या -त्या कक्षात असणे अपेक्षित होते. मात्र त्या ठिकाणी ते निर्दशनास येत नाही. परिणामी भांडारपाल , तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी भ्रष्टाचार केल्याची शक्यता नाकरता येत नाही. याबाबत मनसेच्या वतीने आरोग्यसेवा उपसंचालक अकोला यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी सहा सदस्यीय समिती नेमली परंतू या समितीच्या कामात पारदर्शकता जाणवत नाही. तसेच भांडार पडताळणी पथक जिल्हा रुग्णालयात येवून सुध्दा त्यांनी अचूकपणे कामगिरी बजावली नाही.
वास्तवात पडताळणी पथकाने भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला पाहिजे होता. कदाचित अर्थपूर्ण आर्शीवादाने त्यांनी छुप्पी साधली असेल. परिणामी मार्च 2020 ते जुन 2023 या काळात जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे झालेल्या ऑडीटचे पुर्नमुल्यांकन करण्य़ात यावे, तसेच भंडार पडताळणी अधिकाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराची आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अखत्यारीत चौकशी करावी. त्या अफरातफर झालेल्या रक्कमेची वसुली करुन शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात यावी, शिवाय दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणीही मनसे तालुकाअध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी केली आहे.*
0 Comments