जिल्ह्यातील खेड्यापाड्यात महिला बचतगटांचे जाळे विणले गेले आहे. एक आर्थिक चळवळ यामाध्यमातून कार्यरत आहे. जिल्ह्याच्या विकासात महिला बचतगटांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी केले. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनअंतर्गत युनियन बँकेच्या बुलढाणा शाखेतर्फे महिला बचतगटांना १२ सप्टेंबर रोजी कर्ज वितरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, श्री वैद्य, श्री. सोनटक्के, युनियन बँकेचे विभागीय व्यवस्थापक अनुप तराळे, शाखा व्यवस्थापक रवींद्र चोपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी युनियन बँकेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. यावेळी १२७ महिला बचतगटांना ७ कोटी ५० लाख रुपयांचे अर्थसाहाय्यकरण्यात आले आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवण्याकरिता सुद्धा त्यांचा पुढाकार असतो, महिला बचतगटांना पाठबळ देण्याची भूमिका स्वागतार्ह आहे. महिलांनी पैशाचा योग्य विनियोग करुन व्यवसायात भरारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.राजर्षी शाहू परिवार महिला बचतगटांच्या पाठीशी राजर्षी शाहू परिवाराने महिला बचतगट चळवळीसाठी सदैव भरीव योगदान दिलेय. आतापर्यंत आपण बचतगटांच्या ३५ हजार महिलांना १५० कोटींचे अर्थसहाय्य केले आहे. भविष्यातही महिला सक्षमीकरणासाठी आपला पुढाकार राहील, असे अभिवचन त्यांनी दिले. युनियन बँकेने एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल बँक प्रशासनाचे त्यांनी कौतुक केले. युनियन बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
0 Comments