चिखली :
तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्रातील गैरव्यवहाराविषयी नुकतीच तक्रारीनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी काही केंद्रांवर कारवाई केली. मात्र, तहसील कार्यालयाच्या आवारातच सुरू असलेल्या अवैध महा-ई-सेवा केंद्रावर मात्र अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या संदर्भात दयावान सरकारचे जिल्हा अध्यक्ष मनोज जाधव यांनी तहसील कार्यालयास स्मरणपत्र दिले असून, नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या या केंद्रावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
महा-ई-सेवा केंद्र नियम व शासनाच्या परवानगीशिवाय चालवले जाणे हे नागरिकांची दिशाभूल करणारे असून, शासनाच्या आदेशाचा अवमान आहे. एकीकडे कायदेशीर व अधिकृत परवाना घेऊन काम करणाऱ्या केंद्रांवर कारवाई होत असताना, तहसील आवारातील अवैध केंद्रावर दुर्लक्ष होत असल्याने प्रशासकीय प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मनोज जाधव यांनी सांगितले की, “नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणूनच ही मागणी केली आहे. शासनाच्या GR नुसार तहसील आवारात महा-ई-सेवा केंद्र सुरू ठेवणे नियमबाह्य आहे. प्रशासनाने निष्पक्ष कारवाई करून नागरिकांचा विश्वास टिकवावा.”
यावेळी जिल्हा प्रशासनाकडून या विषयावर तातडीने चौकशी करून, संबंधित अवैध केंद्रावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा ईशारा सुद्धा देण्यात आला आहे
0 Comments