खामगाव :- दि.१३ (उमाका)शहरासह तालुक्यातील हॉटेल, ढाबे व इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा खामगावचे तहसिलदार सुनिल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या निर्देशानुसार तालुकास्तरीय विशेष दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाद्वारे तालुक्यातील गॅस एजन्सी व पेट्रोल पंपांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे.
प्रशासनाकडून खामगाव शहर व तालुक्यातील सर्व गॅस एजन्सी, पेट्रोल पंप चालक, हॉटेल, उपहारगृह, ढाबा मालक तसेच मंगल कार्यालय चालकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅसचा वापर करणे हा कायद्याने गुन्हा असून असे आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
दक्षता पथकाची करडी नजर
तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेले विशेष पथक तालुक्यातील गॅस एजन्सी व पेट्रोल पंपांची तपासणी करणार आहे. या तपासणीदरम्यान अनियमितता, साठेबाजी किंवा नियमभंग आढळल्यास संबंधित मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील.
पुरवठा सुरळीत; अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन
सध्या तालुक्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. चुकीच्या बातम्यांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार सुनिल पाटील व निरीक्षण अधिकारी रोशनी फुलझले यांनी केले आहे.
0000000
0 Comments