*खामगावात गटविकास अधिकाऱ्या विरोधात एल्गार; निलंबनाची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा*
खामगाव/(संतोष आटोळे ) खामगाव तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभारामुळे विकासकामांना खीळ बसल्याचा आरोप करत भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून निलंबन करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी बुलढाणा, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) तसेच उपविभागीय अधिकारी, खामगाव यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, संबंधित गटविकास अधिकारी मागील सात वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असून त्यांच्या कारभारावर अनियमिततेचे आरोप आहेत. राजकीय दबावाखाली निर्णय घेतले जात असल्याने तालुक्यातील विकास निधी योग्य पद्धतीने खर्च होत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली असून विकास प्रक्रियेला मोठा फटका बसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, १५ व्या वित्त आयोगाचा निधी उपलब्ध असतानाही मागील दोन वर्षांपासून लाखो रुपयांचा निधी खर्च न झाल्याची बाब समोर आली आहे. यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामे ठप्प झाली असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
सदर निवेदन भूमी मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष तथा बहुजन मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष भाई महेंद्र रामभाऊ खंडारे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले निवेदनावर गौतम जाधव, प्रमोद इंगळे, विजय इंगळे आनंदा मोरे, गोपाल ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्या असून, विविध पदाधिकाऱ्यांनी त्यास पाठिंबा दर्शविला आहे.
0 Comments