जळगाव जामोदमध्ये गॅसचा 'काळबाजार' जोरात; सामान्यांच्या चुली विझल्या, वाहने मात्र घरगुती गॅसवर सुसाट!
एकीकडे सरकार 'उज्ज्वला' योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस पोहोचवल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे जळगाव जामोद तालुक्यात मात्र गॅस सिलिंडरसाठी सर्वसामान्यांना वनवन फिरावे लागत आहे. तालुक्यात सध्या घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून, गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, तासनतास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ महिलांवर आली असून, ग्रामीण भागात पुन्हा 'चूल' पेटली आहे.तालुक्यात गॅसचा अधिकृत तुटवडा नसतानाही नागरिकांना सिलिंडर मिळत का नाही? याचं उत्तर जळगाव जामोदच्या रस्त्यांवर धावणाऱ्या तीन चाकी आणि चार चाकी वाहनांमध्ये दडलं आहे. परिसरात कुठेही अधिकृत 'एलपीजी गॅस पंप' उपलब्ध नसताना शेकडो वाहने गॅसवर धावत आहेत. ही वाहने घरगुती वापराच्या सिलिंडरमधून अवैधरित्या गॅस भरून (Refilling) चालवली जात असल्याचे उघड गुपित आहे.हॉटेल, ढाबे आणि वाहनांसाठी घरगुती गॅसचा सर्रास वापर सुरू आहे. एजन्सीकडून सामान्यांना 'स्टॉक नाही' असे सांगितले जाते, मात्र जादा पैसे मोजल्यास काळबाजारात सिलिंडर उपलब्ध होत असल्याची चर्चा आहे.अवैध गॅस रिफिलिंगचे अड्डे शहरात राजरोस सुरू असताना पुरवठा विभाग मूग गिळून गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
"आम्ही पहाटेपासून रांगेत उभे राहतो, पण आमचा नंबर येईपर्यंत गॅस संपल्याचे सांगितले जाते. मग ही गॅसची गाडी जाते कुठे? श्रीमंत आणि गाडीवाल्यांना गॅस मिळतो, पण आमच्या गरिबांच्या चुली का विझवल्या जात आहेत?" असा संतप्त सवाल एका गृहिणीने उपस्थित केला आहे.जळगाव जामोद तालुक्यातील अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर तात्काळ छापे टाकून, घरगुती सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.जर येत्या काही दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही आणि अवैध वापर थांबला नाही, तर तहसील कार्यालयावर 'रिकाम्या सिलिंडर'सह मोर्चा काढण्याचा इशारा तालुक्यातील जनतेने दिला आहे. आता पुरवठा विभाग यावर काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
0 Comments