रस्त्याचे काम अर्धवट सोडून कंत्राटदार गायब
रेखा प्लॉट भागातील नागरिक त्रस्त
खामगाव स्थानिक रेखा प्लॉट भागात रस्त्याचे काम अर्धवट सोडून कंत्राटदाराची यंत्रणा गायब झाली आहे. जवळपास अडीच महिन्यांपासून हे काम रखडले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न करण्यात आल्यामुळे दुचाकीस्वार व स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान दररोज या संतापजनक स्थितीला तोंड द्यावे लागत असताना नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.येथील रेखा प्लॉट भागातील मुख्य रस्त्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तलाव रोड पासून ते हनुमान व्यायाम शाळे पर्यंत असा जवळपास अर्धा किमी सिमेंट रस्ता, इलेक्ट्रिक पोल शिफ्टिंग, दोन्ही बाजूने नाल्या, पाईप लाईन व पेव्हर ब्लॉक आदी कामांचा यात समावेश आहे. या भागासाठी हे ऐतिहासिक काम मानल्या जात असून रस्ता पूर्ण झाल्यावर पूर्णपणे चेहरा मोहरा बदलणार आहे. दरम्यान जवळपास आठ महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये कंत्राटदाराकडून दोन्ही बाजूंनी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र सुविधेपेक्षा त्रासदायक हे कायम ठरत आले आहे. सुरुवातीपासूनच संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे हा रस्ता आतातागायत केवळ ४० टक्के पूर्णत्वास गेला आहे. कंत्राटदाराने रस्त्याचे दोन्ही बाजू पूर्ण केल्या मात्र मधातील काम अर्धवट सोडून पळ काढला आहे. जवळपास अडीच महिन्यांपासून हे काम रखडल्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर पडलेला मुरूम, दगड, धूळ यामुळे रोज लहान मोठे अपघात घडत असून रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जुन्या नाल्या तोडण्यात आल्यामुळे सांडपाणी रस्त्याच्या कडेलाच साचत असून मच्छरांचा देखील उपद्रव वाढला आहे. कंत्राटदार कंपनीच्या बेफिकीरपणामुळे हा रस्ता नागरिकांच्या जिवावर उठला असून नगर परिषद प्रशासन मात्र याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
धुळीने नागरिक हैराण, आरोग्य धोक्यात
रेखा प्लॉट भागातील हा मुख्य रस्ता वर्दळीचा आहे. अर्धवट कामामुळे रहिवाशांसह रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना धुळीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. बारीक धूळ आणि मातीचे कण डोळ्यात जात असल्याने अनेकांना त्रास होत आहे. हा त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने सदर रस्त्यावर दिवसातून दोन वेळा टँकरद्वारे पाणी मारावे व रखडलेले रस्ता काम सुरू करण्याबाबत कंत्राटदाराला सुचना कराव्यात अशी मागणी होत आहे.
0 Comments