*युगधर्म पब्लिक स्कूल, खामगावला महाराष्ट्र शासनाचा क्रीडा पुरस्कार जाहिर*
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी वय वर्षे १४ व १७ या गटांमध्ये मुला-मुलींसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये स्थानिक युगधर्म पब्लिक स्कूल, खामगाव येथील विद्यार्थ्यांनी वय १४ व १७ या गटांमध्ये विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन जिल्हास्तर, विभागीय स्तर तसेच राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने युगधर्म पब्लिक स्कूल, खामगाव या शाळेला महाराष्ट्र शासनाचा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. महानाकर यांच्या हस्ते शाळेचे अध्यक्ष माननीय श्री. गोपालजी अग्रवाल यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी आयोजित अभिनंदन कार्यक्रमात अध्यक्ष श्री. गोपालजी अग्रवाल यांनी सांगितले की, युगधर्म पब्लिक स्कूल, खामगाव येथे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासावरही विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी शाळेमध्ये विविध ऐच्छिक क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्याची संधी व योग्य मार्गदर्शन दिले जाते.
खामगावातील प्रत्येक विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचावा, हा शाळेचा प्रयत्न आहे.
क्रीडा क्षेत्रातील या यशाचा विद्यार्थ्यांना भविष्यातही लाभ होत असून शासनाच्या नोकऱ्यांमध्ये मिळणारा ५ टक्के क्रीडा राखीव कोटा, तसेच अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत मिळणाऱ्या क्रीडा कोट्याचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे, शाळेचे प्राचार्य श्री. ए. बी. अवचार व सर्व शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. ए. बी. अवचार यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच शाळेचे अध्यक्ष यांचे आभार व्यक्त केले.
शाळेच्या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा यशामुळे पालकांचा शाळेत प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर ओघ वाढत असून, युगधर्म पब्लिक स्कूल, खामगाव ही शाळा खामगाव शहरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना पालक व विद्यार्थी व्यक्त करत आहेत. त्यामुळेच ही शाळा क्रीडा क्षेत्रासाठी प्रथम पसंतीची शाळा ठरत आहे.
सध्या शाळेमध्ये ३ ते १० वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ९ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी १५ एप्रिल ते १५ मे २०२६ या कालावधीत भव्य समर कॅम्प आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे.
0 Comments